पुणे : वायरच्या साहाय्याने गळफास घेत माजी खासदाराच्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विकास किसनराव बाणखेले (वय-५२) आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा घटना गुरुवार (दि.२३) त्यांच्या राहत्या घरी मंचर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विकास बाणखेले नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि लाला अर्बन बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. परंतु आवाजाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. त्यानुसार रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार मंचर पोलिसांनी विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार सुमित मोरे करीत आहेत. माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते. विकास यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.