महिला कॅशियरने घातला 13 लाखांचा गंडा ! खोट्या पावत्या, बिले बनवून शोरुम मालकाची केली फसवणुक

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : दुचाकीच्या शोरुममध्ये कॅशियर म्हणून काम करणार्‍या महिलेने रोख, ऑनलाईन रक्कम, ग्राहकांचे शॉर्ट रक्कम, एक्सरसरिज साहित्य व इतर साहित्य यामध्ये खोटया पावत्या व खोटे रिपार्ट तयार करुन तब्बल १२ लाख ९४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीबाबत या महिलेला विचारणा केली असता तिने आता मी जीवाचे काहीतरी बरे वाईट करुन घेते, असे ई मेल पाठवून दिला होता. याबाबत जिगर निवृत्ती गवळी (वय ३८, रा. राजतारा कॉम्प्लेक्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किर्ती विशाल गोडसे (रा. मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शेवाळवाडी येथील प्लॅटीनम अ‍ॅटो हे रॉयल एनफिल्ड या वाहनाच्या शोरुममध्ये एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शोरुममध्ये किर्ती गोडसे कॅशियर म्हणून काम करत होत्या. कंपनीच्या अखत्यारित ग्राहकांकडून रोखीने, क्रेडीट कार्ड व ऑनलाईनद्वारे रक्कम जमा करुन घेणे व पोहच पावती देणे, ग्राहकास वाहन विक्री संदर्भात संवाद साधणे, मालमत्ता साठा व वाहन उपकरणे याचा तपशील ठेवणे व विक्री करणे, कंपन्याच्या अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या विस्तृत नोंदी ठेवणे तसेच कंपनीचा दिवसभराचा व्यवहाराचा तपशील पूर्ण करुन लेखापाल विभागाकडे सुपूर्त करणे इत्यादी त्यांची कामे होती.

माजंरी येथील शोरुममध्ये ग्राहकांच्या येणार्‍या रक्कमांमध्ये तफावत जाणवत असल्याने फिर्यादी यांनी जनरल मॅनेजर, हेड लेखापाल व इतरांकडून शोरुमचे ऑडिट करुन घेतले. त्यात रोख व ऑनलाईन रक्कम, ग्राहकांचे शॉर्ट रक्कम एक्सरसरीज साहित्य व इतर साहित्य यामध्ये किर्ती गोडसे हिने खोट्या पावत्या व खोटे रिपोर्ट तयार करुन १२ लाख ९४ हजार ९२४ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. याबाबत किर्ती गोडसे यांच्याकडे विचारणा केल्यावर तिने जीवाचे काही तरी बरे वाईट करुन घेते, असे शोरुमच्या मेलवर मेल पाठवून सांगितले. पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. गेल्या २ ते ३ महिन्यांपासून तिने मोबाईल बंद केला आहे. शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags