पुणे : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यवतमधील रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या घरावर (दि.५) मध्यरात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे. अविनाश उर्फ विश्वजित शशिकांत चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शशिकांत चव्हाण, प्राची चव्हाण आणि उज्वला चव्हाण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांचा तपास सुरु आहे. (Murder Case) अधिक माहितीनुसार, यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटूंब राहते, त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला. मध्यरात्री तीन जणांनी चव्हाण कुटुंबीयांच्या घरामध्ये शिरकाव करत चव्हाण कुटुंबीयांना मारहाण केली. हे तीन इसम बनियान आणि चड्डी घालून चव्हाण यांच्या घरात घुसले होते.
हे इसम चोरीच्या उद्देशाने आले होते का? या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. परंतु हा हल्ला जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय चव्हाण कुटुंबियांना आहे. त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात सुरू आहे. जखमींवरती लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.