राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
गुगल मॅपवर चाकण-शिक्रापूरला जाणारा जेजुरी-बेल्हे मार्ग हा एम.जी.रोड दर्शविल्यामुळे चालकांची फसगत होते. तरी हा मुख्यमार्ग प्रयागधाम फाटा मार्गे असल्याचे करेक्शन तसेच दिशादर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्य महामार्ग यांनी लावले तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल.
शरद चव्हाण (वाहतुक नियंत्रण अधिकारी उरुळी कांचन)
उरुळी कांचन येथील ट्रॅफिक समस्येमुळे स्थानिक नागरिक, वाहन चालक, प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना होणा-या त्रासापासून मुक्ती द्यावी अन्यथा संबंधित प्रशासनाविरोधात जन आंदोलन केले जाईल.
प्रा. सदाशिव कांबळे(अध्यक्ष समाज परिवर्तन ब्रिगेड)
उरुळी कांचन येथून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि बेल्हे-जेजुरी राज्य महामार्ग मुख्य चौकात एकत्रित येतात. मुख्य तळवाडी चौकात पूर्व दिशेकडून इंदापूर-चौफुला मार्गे सोलापूरवरुन येणारी, पश्चिम दिशेकडून हडपसर-लोणीकाळभोर मार्गे पुण्यावरुन येणारी, दक्षिण दिशेकडून बेलसर-शिंदवणे मार्गे जेजुरीवरुन येणारी, उत्तर दिशेकडून शिक्रापूर-अष्टापूर मार्गे बेल्हेवरुन येणारी प्रवासी तसेच लोडयुक्त वाहने मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे अक्षरश: वाहतूक नियंत्रणÁ करताना ट्रॅफिक पोलीसांना मोठी कसरत करावी लागते. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांना तर रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. कर्णकर्कश आवाजामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. कधी-कधी अपघात सदृश चित्र येथे पाहवयास मिळते.
तळवाडी चौकात चारही बाजूला सिग्नल दिवे आहेत. परंतु, ते दिवस-रात्र बंद असून धूळ खात पडलेले आहेत. सिग्नल सुरु नसल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धाव घेतात. नजीकच्या तरडे गावातून भारत पेट्रोलियमच्या येणा-या टॅंकर्सनी धुडगूस घातलेला दिसतो. दिवसभरात सरासरी १५० च्या आसपास हे टॅंकर्स चौकात घाई-घाईने ओव्हरटेक करतात. माणसांच्या जिवाची किंमत आहे की नाही.? असा प्रश्न निर्माण होतो. या टॅंकर्सना वेळीच नियमाधीन बंधन घालणे गरजेचे आहे. अन्यथा चौकात ज्वलनशील स्फोट होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
*तळवाडी आणि पीएमपीएल चौक परिसरात सर्व्हिस रोडवरील अनाधिकृत दुकाने, होर्डींग्स, रिक्षा थांबे यांच्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. अधिकृत राष्ट्रीय राज्यमार्ग, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तसेच संबंधित यंत्रणेने तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. नागरिकांना तसेच पादचारी यांना सुलभ व सुकर ये-जा करण्यासाठी, वाहन चालकांना सुखमय वाहतूक करण्यासाठी संबंधित प्रशासनाने दक्षतापूर्वक अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे.*
पीएमपीएल समोर स्थित अनाधिकृत रिक्षा थांब्यामुळे बस चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पीएमपीएल स्थानकात बसपेक्षा खाजगी वाहनांनी पार्किंग झोन करत मुक्काम ठोकला आहे. येथील होर्डींग्समुळे बस चालकांना वळणे घ्यायला अडथळा झाला आहे. पीएमपीएलचे अधिकारी हरभरा भरडण्याच्या कामात मशगूल आहेत.
उरुळी कांचन येथे ओव्हरब्रिज करणार.! या वल्गनेने स्थानिक नागरिकांना एप्रिल फुल करत, झिम्मा-फुगडी खेळण्याचा लपंडाव हा चोरी-चोरी चुपके-चुपके खेळ खेळत लोकप्रतिनिधी कानाडोळा करताहेत.