राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
अष्टापूर (ता. हवेली) – संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत विरोधकांचा पूर्णपणे पराभव करत सहकार क्षेत्रातील आपली भक्कम पकड त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर या संस्थांप्रमाणेच अष्टापूर सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीतही प्रकाश जगताप आणि यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांना आव्हान देण्याचा प्रयत्न विद्यमान संचालक शामराव कोतवाल आणि माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांनी केला होता. मात्र निकालाने विरोधकांचा सपशेल पराभव करत जगताप बंधूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन चव्हाण यांनी अधिकृत निकाल जाहीर केला. सर्व उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला आहे.
विजयानंतर पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकाधिक योजना राबविल्या जातील, विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि संस्थेची वाटचाल उत्कृष्ट नियोजनाद्वारे घडवली जाईल.”