पुणे – विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षामध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली असून वडगावशेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव चर्चेत आहे. मुळीक यांना संधी देऊन पक्ष त्यांचे पुनर्वसन करणार का, हे पाहणे यानिमित्ताने औत्सुक्याचे ठरणार आहे.विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या पाच जागांमध्ये भाजपच्या तीन, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) प्रत्येकी एक-एक जागा आहे. येत्या २७ मार्च रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून या जागांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरु झाली असून पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे.मुळीक वडगावशेरी मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात वडगावशेरी मतदारसंघ मित्र पक्ष राष्ट्रवादीकडे (अजित पवार) गेला. त्यामुळे मुळीक नाराज झाले होते. महायुतीमध्ये ते बंडखोरी करणार असल्याची चर्चाही होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मुळीक यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी मुळीक यांना दिले होते. त्यानुसार मुळीक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार सुनील टिंगरे यांना पराभूत व्हावे लागले होते. राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी त्यांचा पराभव केला होता. ही बाब लक्षात घेऊन या मतदरासंघात वर्चस्व राखण्यासाठी मुळीक यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे.