-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.अशात त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 8 जूनरोजी जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली.
जरांगे यांची आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी भेट घेतली आहे.सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे उपोषणाला बसले आहेत. रात्री अचानक त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यरात्री 2.30 वाजता त्यांची भेट घेऊन त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली होती.
जरांगे यांचा सरकारला इशारा
त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आले. तर, आज (12 जून) त्यांनी पत्रकार परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा सांगितली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन देखील केलं.
“शिंदे साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना मी सांगतो की, हे उपोषण मी सहज मागे नाही घेऊ शकत. काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार आहात का, किती दिवस लागणार आहेत?, केसेस मागे घेतल्या जाणार आहेत का?, याबाबत मला आणि माझ्या समाजाला संपूर्ण डिटेल्स हवं.”, अशी मागणी जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली.
“असंच खेळवत राहिले तर कदाचित..”
तसंच पुढे ते म्हणाले की, “तुम्ही असंच खेळवत राहिले तर कदाचित हे माझं शेवटचं उपोषण असेल. असं सारखं सारखं उपोषण करायाला मला तरी कुठं वेळ आहे. तुम्ही खेळवत राहिले तर मी आणि माझा समाज डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल.”, असा इशाराच यावेळी जरांगे यांनी दिलाय. तसंच एकदा काय हे उपोषण थांबलं तर मी थांबणार नाही, मग आमच्या नावाने बोंबलत बसू नका. असंही जरांगे यांनी म्हटलं.
“मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या, आमचा शिंदे साहेबांवर, सरकारवर आजही विश्वास आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत, हे मी मागेच सांगितलं आहे.”, असंही (Manoj Jarange) यावेळी जरांगे म्हणाले आहेत.