राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहिरात वादात सापडली आहे. अधिवेशनावेळी जाहीर केलेल्या याजनांमधील ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेच्या जाहिरातीमध्ये तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा फोटो समोर आला आहे.
शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार या योजनेची घोषणा केली होती. या योजनेची जाहिरात आता चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागिरक दाखवलेत तेच गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जाहिरातीवर चक्क तीन वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आल्याने कुटुंबालाही धक्का बसला. शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्र्वर विष्णू तांबे 68 वर्षीय वृध्द हे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याचे त्यांची सून सुरेखा तांबे यांनी सांगितले. सासरे महिना महिना घरी येत नसायचे मात्र मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाही, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार आम्ही केली नाही. पण आता जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाल्याचं सुरेखा तांबे म्हणाल्या.
ज्ञानेश्वर तांबे यांना आम्ही गावात फिरू नका सांगितले होते. त्यांनतर ते 14 जानेवारी 2021 पासून बेपत्ता आहे. कोरोनामध्ये ही एकदा आळंदीत ब्लँकेट वाटताना त्यांचा पेपरमधे फोटो आला होतं. तेव्हा असे वाटले की तांबे हे हयात आहे. मात्र त्यांचा त्यावेळी शोध लागला नाही आता पुन्हा मुख्यमंत्री यांच्या जाहिरातीवर तांबे यांचा फोटो पाहिल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. कारण आता आमच्या गावातील ज्ञानेश्वर तांबे हे हयात अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.या सरकारला जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोडं भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? सरकारच्या जाहिरातीसाठी जनतेचा पैसा असाच वाया जातोय आणि ते करताना जनतेच्या फोटोंचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.इंटरनेट आणि सोशल मीडिया वरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे. महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहे, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.