राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून राज्य मंत्रिमंडळाची चर्चा सुरु आहे. राज्यातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची उत्सुकता लागली आहे. असे असताना आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असून, विधिमंडळाचे चालू अधिवेशन आटोपल्यानंतर हा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 12 जुलैपर्यंत असून, त्याच दिवशी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, भरत गोगावले, संजय शिरसाट, नितेश राणे, रणधीर सावरकर या नेत्यांना मंत्रिपदं मिळतील असे सांगितले जात आहे.
मुंडे, पडळकर, राणे, रावल, सावरकरांची नावे
संभाव्य चेहऱ्यांमध्ये नितेश राणे, रणधीर सावरकर यांच्यासह जयकुमार रावल, जयकुमार गोरे, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर, मकरंद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्याआधी हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. नवे मंत्री घेताना महायुतीतील पक्षांचा कस लागणार आहे.