राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, वाघोली (प्रतिनिधी):
वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. संजीवनी सर्जेराव वाघमारे यांनी शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शुभहस्ते झालेला हा प्रवेश सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नेतृत्व केले, तर महिला संपर्कप्रमुख सौ. सारिका ताई पवार यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वाघोली परिसरातील शेकडो महिलांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महिलांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला सामूहिक प्रवेश शिवसेनेच्या संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ करणारा ठरला आहे.
सौ. संजीवनी वाघमारे या भीमा कोरेगाव रणस्तंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांच्या पत्नी आहेत. सर्जेराव वाघमारे हे हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य असून सामाजिक आणि ऐतिहासिक चळवळींमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. सौ. संजीवनी वाघमारे यांनी पाच वर्षे वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्य करताना गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यांचे नेतृत्व, महिलांमध्ये प्रभावी संवाद आणि गावातील विविध समस्यांवर केलेली कार्यवाही यामुळे त्या परिसरात ओळखल्या जातात.
शिवसेनेला नवसंजीवनी:
सौ. संजीवनी वाघमारे यांचा पक्षप्रवेश केवळ व्यक्तीगत नाही, तर संपूर्ण वाघोली परिसराच्या राजकारणात एक नवा कलाटणीबिंदू मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला या भागात नवसंजीवनी मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर त्या आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास पक्षाच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
स्थानिक स्तरावर नवे समीकरण:
या प्रवेशामुळे वाघोली, केसनंद रोड, लोहगाव परिसरात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक पक्षांपुढे स्थानिक पातळीवर शिवसेनेचे बळ वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या संघटनात्मक बांधणीला आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत
या प्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवसेना ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, महिलांना प्रतिष्ठा देणारी, आणि महाराष्ट्राच्या हितासाठी झटणारी संघटना आहे. संजीवनी वाघमारे यांसारख्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश होणे, हे शिवसेनेच्या विचारांची आणि कृतीशील नेतृत्वाची पावती आहे.”
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक कार्यकारिणीने यशस्वीपणे पार पाडले.