राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा – वाघोली
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत वाघोली येथे आयोजित जनता दरबार नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडला. या दरबारात विविध नागरी प्रश्न, अडचणी व तक्रारी थेट आमदारांसमोर मांडण्यात आल्या. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा, शासकीय योजनांचा लाभ अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चासत्र रंगले.
आमदार कटके यांनी सर्व नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले. काही समस्यांचे निराकरण उपस्थित अधिकाऱ्यांच्या समवेत घटनास्थळीच करण्यात आले, तर काही प्रकरणांबाबत आमदारांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
दरबारात बोलताना आमदार कटके म्हणाले,
> “नेतृत्व म्हणजे भाषण नव्हे, तर जमिनीवर उतरून लोकांच्या भावना समजून घेणं.
तुमच्या प्रेमामुळेच ही सेवा शक्य होते.
विश्वासाचं सार्थक करणं हेच माझं कर्तव्य आहे.”
ते पुढे म्हणाले,
> “संवेदनशीलता आणि तत्पर सेवा हाच माझ्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र आहे.
जनतेत समाधान आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होणं, हेच माझं खऱ्या अर्थाने यश आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व सकारात्मकतेचा सूर उमटला. वाघोलीतील स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.