राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी काल (रविवार,15 डिसेंबर) नागपुरात पार पडला.यात यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे पाचव्यादा आमदार म्हणून निवडून आलेले संजय राठोड यांनीही आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले होते. अशातच संजय राठोड यांना माझा विरोध कायम राहील, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा घेतला आहे.संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे, त्यांना गत मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आलं असलं तरी माझी लढाई अजून संपलेली नाही. मुळात उद्धव ठाकरे यांना मी प्रश्न विचारते की त्यांनी क्लीनचीट का दिली? संजय राठोड यांना जरी मंत्रीपद दिले असलं तरी माझा विरोध हा कायम राहणार आहे, असे म्हणत संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आमदार चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली आहे.माझी लढाई अजून संपलेली नाही
महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाघ यांनी पोलीस स्टेशनला जाऊन पीडित कुटुंबीयांच्या न्यायाची मागणी केली होती. तसेच, संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासही महाविकास आघाडी सरकारला भाग पाडले होते. मात्र, शिवसेनेतील बंडानंतर संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पुन्हा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर, चित्रा वाघ यांची भूमिका मवाळ झाली. तसेच, राठोड यांच्याविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिकाही बदलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आता महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही संजय राठोड यांना स्थान मिळेल, यासंदर्भात चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली.
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात-
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र अवघ्या सात दिवसांच्या या अधिवेशनात किती प्रश्न मार्गी लागणार हा प्रश्नच आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला, मात्र खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाला आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाला सरकारने कात्री लावलीय. मंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली असल्याने प्रश्नोत्तराचा तास नाही. आज पहिल्याच दिवशीसरकारतर्फे पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. राज्यपाल अभिभाषण आणि आर्थिक धोरणांवर या अधिवेशनात चर्चा होईल. हिवाळी अधिवेशनात 20 विधेयकं मांडली जातील. सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होईल. शपथविधी राहिलेल्या काही आमदारांना आज सुरूवातीला शपथ दिली जाईल. त्यानंतर नव्या मंत्र्यांचा परिचय होईल. आज ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत. तसंच परभणीतलं हिंसक आंदोलन, त्यानंतर पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन यावरूनही सरकारला विरोधक जाब विचारणार आहेत.