राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) – चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे औपचारिक उद्घाटन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्य वाटप करून करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोम, आत्मविश्वास आणि शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली आहे.
या उपक्रमाची संकल्पना यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सुभाष आप्पा जगताप, व्हॉइस चेअरमन मा. किशोरजी उंद्रे, व सचिव मा. जरे साहेब यांनी मांडली होती. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि शिक्षणास दिलेल्या प्राधान्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी शालेय समिती अध्यक्ष श्री मोरेश्वर (बापू) काळे होते.या प्रसंगी बोलताना श्री मोरेश्वर काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मोबाईलचा वापर शक्यतो टाळावा किंवा अत्यंत मर्यादित ठेवावा. त्याऐवजी वाचनाची सवय लावून घेतल्यास ज्ञानात प्रचंड भर पडते. वाचन हे व्यक्तिमत्त्व घडवणारे आणि आयुष्य घडवणारे साधन आहे.”
या प्रसंगी शाळेचे विश्वस्त श्री नवनाथ (आबा) काकडे, श्री विजयजी चौधरी, श्री शामराव कोतवाल, श्री रमेश गोते, मुख्याध्यापक काकडे सर, पर्यवेक्षक जठार सर, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नरवणे मॅडम यांनी अतिशय नेटकेपणाने पार पाडले, तर आभारप्रदर्शन जठार सर यांनी मानले
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्य नव्हे, तर एक सकारात्मक प्रेरणा, शिक्षणाविषयी नवीन दृष्टिकोन आणि जबाबदारीची जाणीव देण्यात आली.
चिंतामणी विद्यालय हे थेऊर परिसरातील एक नामांकित शिक्षणसंस्था असून, सामाजिक भान ठेवत अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि पालकवर्ग यांच्या सहकार्याने संस्था सातत्याने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमानंतर उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या उपक्रमामुळे अनेक गरजू व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता झाली असून त्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही याची खात्री निर्माण झाली आहे.
—