छत्रपती सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी
पुणे – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत आणि सामाजिक बांधिलकी जपत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त छत्रपती सेवा संघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला.
हा उपक्रम गुरुदत्त शिक्षण ट्रस्ट संचलित मातोश्री रमाई आंबेडकर निवासी आश्रम शाळा, काकडेमळा येथे पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रबर, दप्तर आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात बळ देणारा आणि प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमास छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागरभाऊ राजगुरू, ऋषी बिनावत, यशवंत बोराळे, निखिल काकडे, अविनाश भोसले, यश कांबळे, श्रीजय कांबळे, सतिश गावडे, ग्रामपंचायत सदस्य दादा काकडे, चेअरमन नवनाथ कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते योगेश काकडे, चिंतामणी भोसेकर,तसेच अनेक सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करून, परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतीरूप देणारा हा स्तुत्य उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.