
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणीकाळभोर (ता. हवेली):
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन सोहळा उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची ओढ निर्माण करणे, संशोधनास चालना देणे व राष्ट्रीय वारसा जतन करण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज, उरुळीकांचन येथील प्रा. डॉ. अमोल बोत्रे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इतिहासाची भूमिका स्पष्ट केली. “इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून तो स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. शासनाच्या विविध विभागांत – पुरातत्व, अभिलेख व संग्रहालय या क्षेत्रांत इतिहास विषयक करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधन, लेखन व वारसा जतन करण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अंबादास मंजुळकर यांनी भूषविले. “मी स्वतः इतिहास विषयाचा प्राध्यापक असून आजवर २७ पुस्तके लिहिली आहेत. ती महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. भारताच्या पाच हजार वर्षांच्या गतवैभवाचा व आधुनिक काळातील घटना-प्रसंगांचा अभ्यास करून ऐतिहासिक नोंदी घेणे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे,” असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
इतिहास विभागाचे प्रा. सुहास नाईक यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मंडळाची उद्दिष्टे व शैक्षणिक फायद्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. रुपाली ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सर्जनशील भित्तीपत्रिकांचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. प्राचार्य प्रा. डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या हस्ते या भित्तीपत्रिकांचे उद्घाटन झाले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. सतीश कुदळे, प्रा. डॉ. एस. एस. पाटील व प्रा. गितांजली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनी संजीवनी कोळेकर हिने कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी गणेश जाधव याने आभार मानले.
यशश्री जैनजांगडे, प्रतिक लोंढे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आणि इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








