
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणीकाळभोर : प्रतिनिधी
कुस्ती या पारंपरिक खेळात लोणीकाळभोरच्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व एम.एस. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती (ग्रिको-रोमन) स्पर्धेत या महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश गणेश अहिरे (प्रथम वर्ष वाणिज्य) याने ७२ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला.
ऋषिकेशने अत्यंत शिस्तबद्ध, दमदार व तांत्रिक कुस्ती सादर करत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली. अंतिम फेरीत तो थोडक्यात पराभूत झाला असला तरी, त्याच्या दमदार खेळीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कामगिरीच्या जोरावर ऋषिकेशची निवड पुढील विभागीय स्पर्धेसाठी झाली असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयातूनच नव्हे तर लोणीकाळभोर परिसरातूनही उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी विशेष अभिनंदन करताना सांगितले की, “ऋषिकेशने मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आमच्या महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला त्याने नवा आयाम दिला असून, विभागीय स्पर्धेत तो निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास आहे.”
स्पर्धेसाठी ऋषिकेशला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. निशिगंधा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेशने केवळ शारीरिक तयारीच नव्हे तर तांत्रिक कौशल्यांवरही मेहनत घेतली होती.
लोणीकाळभोर महाविद्यालयाने यापूर्वी विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडवले आहेत. या यशस्वी परंपरेत ऋषिकेश अहिरेच्या कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
कुस्तीच्या या स्पर्धेत ऋषिकेशच्या विजयाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सहविद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे. पुढील विभागीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे








