
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणीकाळभोर (ता. हवेली) : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, प्रा. नानासाहेब शेंडगे, मा. प्रमोद व्हनमाने (मुख्य अभियंता, सांगली जिल्हा परिषद) व प्रा. अर्जुन कचरे यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड यांनी उपाध्याय यांच्या कार्याचा उजाळा दिला. ते म्हणाले, “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांचे शिक्षण कानपूर येथे झाले. १९५२ साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. ‘एकात्म मानववाद’ ही त्यांची विचारसरणी होती. भारताचा विकास फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे, तर बौद्धिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरही व्हावा यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या विचारांची आज उणीव भासत आहे. जर भारत त्यांच्या तत्त्वज्ञानावर चालला, तर भारत निश्चितच महासत्ता बनेल.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी आपल्या भाषणात उपाध्याय यांचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यातील अनेक सेनानींमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची वाटचाल कोणत्या दिशेने असावी याचा स्पष्ट मार्गदर्शन करणारे ते विचारवंत होते. भारताचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर त्यांचा दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.








