राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
थेऊर: : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे मेहनत जिद्द चिकाटी आणि इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतेही लक्ष सहज साध्य करता येत यासाठी मोठा वारसा असलाच पाहिजे असे नाही.थेऊर(ता.हवेली) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील गायत्री ज्ञानेश्वर चंद हे कालपर्यंत कुणालाही माहीत नसलेल्या या नावाने फक्त स्वतःचंच नाही तर आपल्या कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं. सामान्य शेतकरी कुटुंबातील या भूमिकन्येने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अहोरात्र कष्ट करून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली असून कुठल्याही अकॅडमी किंवा स्पर्धा परिक्षा क्लासेस न लावता हे यश संपादन.केल्यामुळे गायत्रीवर सर्वच थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या गुणवत्ता यादीत १८ व्या स्थानावर विराजमान होवून अगदी सहजपणे तिने हे यश संपादन केले आहे.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून शिक्षणाच्या जेमतेम सुविधा असलेल गाव आहे. चांगले शिक्षण घ्यायचे तर पुणे शहरात जावे लागते. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यास गावापासून दूर पाठवताना घाबरतो. त्यामुळेच बहुतेक मुलींचे शिक्षण गावातच होत असे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गायत्रीने पदवी प्राप्त केली त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.गायत्रीने मिळविलेल्या यशानंतर संपूर्ण गावातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. सोशल मीडियावर देखील एकच मजकूर फिरत होता. घरातील आजी – आजोबा, आई, पदवीधर वडील, पदवीधर बहीणी आणि शालेय शिक्षण घेत असलेल्या भावाचा तसेच गुरुजन वर्गाचा तिच्या यशात मोठा वाटा असून शेतकऱ्यांच्या लेकीने करुन दाखवलं म्हणत घरातील सर्वाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.