थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रुकेवस्ती येथे उपशिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. संजय निवृत्ती आगलावे सर यांना पंचायत समिती, हवेली (शिक्षण विभाग) यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024-25 प्रदान करण्यात आला आहे.
संजय आगलावे सर यांनी सन 2001 मध्ये वस्तीशाळा शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. केवळ 1000 रुपये मानधनावर 14 वर्षे अखंड सेवा बजावत, त्यांनी पगाराच्या अपेक्षा न ठेवता शिक्षणाचे कार्य निष्ठेने सुरू ठेवले. त्यांच्या अथक प्रयत्नांची आणि सेवाभावाची दखल घेत राज्य शासनाने सन 2014 पासून त्यांची नियमित शिक्षक पदावर नियुक्ती केली.
नोकरीच्या 25 व्या वर्षी त्यांना मिळालेला गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची शासकीय पातळीवर घेतलेली अधिकृत दखल होय.
या यशाबद्दल मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती रुकेवस्ती, समस्त थेऊर गावातील जिल्हा परिषद शिक्षकवृंद, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सहकारी मित्रमंडळींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.