थेऊर (प्रतिनिधी) – थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसंदर्भात गंभीर त्रुटी उघडकीस येत असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या इमारतीमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. शाळेतील छतावरून आणि भिंतींमधून पाणी गळत असून, स्लॅबला व भिंतींना भेगा पडलेल्या स्पष्टपणे दिसून येत आहेत. यामुळे वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडथळे येत आहेत.
( ( स्लॅबला)छताला पडलेल्या भेगा)
ग्रामस्थ व पालक वर्गाने व्यक्त केलेल्या संतापानुसार, संबंधित ठेकेदाराकडून हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, अवघ्या दोन ते तीन वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाले असतानाही इतक्या कमी कालावधीत ही स्थिती निर्माण होणे म्हणजे सार्वजनिक निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
(शाळेतील गॅलरीमध्ये असणाऱ्या भिंतीवर बाथरूम मध्ये असणाऱ्या फरशा बसविण्यात आलेल्या आहेत.)
याशिवाय, जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्ता उंचावल्याने समोरील मैदान खड्ड्यात गेले आहे. परिणामी, पावसात या मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये जाण्यासाठी चिखल व साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच बाथरूममध्ये लावण्यात आलेल्या फरश्या गॅलरीतील भिंतींवर बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, संपूर्ण बांधकामामध्ये अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणा दिसून येतो.
या परिस्थितीबाबत शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायत थेऊर प्रशासनाला वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना दिल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
( वर्गामध्ये पावसामुळे साचलेले पाणी)
पालक वर्गाने एकमुखी मागणी केली आहे की, या संपूर्ण बांधकामाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य शिक्षणाचा पर्यावरण उपलब्ध करून द्यावा. अन्यथा पालक वर्गाकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.