पुणे – जेजुरीच्या खंडोबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आजपासून सोमवार (दि.१०) वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून त्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार आता खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असणार आहे.भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावे लागणार आहे.
आतापर्यंत राज्यातील ५२८ मंदिरामध्ये वस्त्र सहिंता लागू करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आमचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितींकडून करण्यात आले आहे.
