राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व संविधान अमृत महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र थेऊरगाव व पंचक्रोशीतील शिवभक्त, शंभुभक्त आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सहभागातून पहिल्यांदाच ‘भीम फेस्टीवल २०२५’ मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागाने साजरा करण्यात आला. तीन दिवसांच्या या महोत्सवात पावसाची जोरदार साथ असतानाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पार पडलेल्या ‘होम मिनिस्टर – पैठणी स्पर्धा’मध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंग भरले. विजेत्या तसेच सहभागी महिलांचे आयोजकांनी हार्दिक अभिनंदन केले.
२४ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम प्रसिद्ध गायिका रेश्मा सोनवणे यांच्याद्वारे सादर झाला. पावसाचे वातावरण असतानाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
२५ मे रोजी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पारंपरिक वाद्यांसह व रथातून मिरवणूक काढण्यात आली. पंजाबी भांगडा, गरबा, बंगाली नृत्य, डिजे लाइट्स आणि स्क्रीनच्या साथीत चार तास रंगलेला हा कार्यक्रम पावसातही नागरिकांनी जल्लोषात अनुभवला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवर, कार्यकर्ते, महिला भगिनी, पोलीस अधिकारी आणि तांत्रिक व्यवस्था पुरवणाऱ्या मंडळींचे आयोजकांकडून विशेष आभार मानण्यात आले. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व थेऊर पोलिस चौकी यांनी दिलेल्या सहकार्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
विशेष उल्लेख म्हणजे, कार्यक्रम दरम्यान पडणारा पाऊस आयोजकांच्या विश्रांतीवेळीच थांबला, याबाबत आयोजकांनी ‘वरुणराजाचे’ही आभार मानले. थेऊर ग्रामपंचायतीने खुर्च्यांची सोय करून उपस्थितांना पावसात बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक होते: मारुतीदादा कांबळे – अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (हवेली तालुका)
सागरभाऊ राजगुरु – अध्यक्ष, छत्रपती सेवा संघ
दादासाहेब बहुले – अध्यक्ष, मारुतीदादा कांबळे युवा मंच
तसेच सर्व पदाधिकारी