ग्रामपंचायतीच्या उदासीनतेतून तरुणांनी दाखवले प्राणीप्रेम; अवजड बैलाला जेसीबीच्या साह्याने गोशाळेत हलवले

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

 थेऊर (ता. हवेली) – गावातील मुख्य बाजारपेठेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून एका जागी हतबल अवस्थेत बसलेल्या एका बेवारस बैलाला गावातील युवकांनी एकत्र येत लोकवर्गणी करून जेसीबी व टेम्पोच्या मदतीने सासवड येथील गोशाळेत हलवले. या कृतीमधून युवकांचे प्राणीप्रेम दिसून आले असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या बाजारपेठेत एक बैल अवजड शरीरामुळे हलूही शकत नव्हता. स्थानिक नागरिकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांकडून प्राथमिक उपचारही करण्यात आले, परंतु बैलाच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. यानंतर नागरिकांनी सासवड येथील गोशाळेशी संपर्क साधला असता, तिकडून बैल गोशाळेत आणल्यास योग्य उपचार करण्याची तयारी दर्शवण्यात आली.

 

त्यानुसार गावातील तरुणांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली, टेम्पोची व्यवस्था केली व राहुल घाडगे यांनी स्वतःच्या जेसीबीच्या साह्याने बैलाला टेम्पोमध्ये हलवले. अनेक तरुणांनी या कामात हातभार लावत बैलाला सासवडला रवाना केले. या प्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते.

 

या प्रसंगात ग्रामपंचायतीच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांपासून या बाबत ग्रामपंचायतीला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा मदत करण्यात आलेली नाही. बैलावर कोणतेही उपचार ग्रामपंचायतीमार्फत न झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

 

स्थानिकांनी पुढे सांगितले की, गावातील जनावरे प्लास्टिकचा कचरा खाऊन आजारी पडत आहेत, त्यांचे पोट फुगत आहे व त्यांना हालचालही करता येत नाही. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags