कचऱ्याने दूषित होतोय थेऊरचा दरवाजा : ग्रामपंचायतीवर कारवाईचा तगादा

Facebook
Twitter
WhatsApp
मृत जनावरे, हॉटेल व चिकन शॉपचा कचरा नदीपात्रालगत टाकला जातोय

 

चिंतामणी नगरीत भाविकांचे स्वागत दुर्गंधी व अस्वच्छतेने!

 

ग्रामपंचायत निष्क्रिय : संघटनांचा इशारा, कारवाई न झाल्यास आंदोलन पेटणारदोषींना पकडणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर

 

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

थेऊर (ता. हवेली) :
जगप्रसिद्ध चिंतामणी मंदिरामुळे भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेले श्रीक्षेत्र थेऊर गाव आज कचऱ्याच्या साम्राज्यात गुदमरते आहे. गावात प्रवेश करतानाच भाविकांचे स्वागत दुर्गंधी, मृत जनावरे, हॉटेल व चिकन शॉपच्या उरलेल्या कचऱ्याने होत आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच अस्वच्छतेचे साम्राज्य बघून भाविकांचा संताप अनावर झाला आहे.
मुळामुठा नदीलगत कोलवडी मार्गावर प्रचंड प्रमाणात कचरा साचला असून, या ढिगाऱ्यात प्लॅस्टिक पिशव्या, उरलेले अन्न, जनावरांचे मृत अवशेष टाकले जात आहेत. या कचराकुंडीमुळे नदीपात्र गंभीरपणे दूषित होण्याचा धोका आहे. त्यात भटक्या कुत्र्यांचे व जनावरांचे वावरणे सुरू असल्याने परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. पुलालगत कचरा असल्याने अपघाताचीही शक्यता प्रचंड वाढली आहे.
छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू यांनी थेट इशारा दिला आहे :
“जर ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई केली नाही, तर हा कचरा उचलून ग्रामपंचायत कार्यालयात टाकला जाईल.”
तर चिंतामणी सेवा मित्र मंडळाचे बाबु बोडके यांनी जाहीर केले आहे :
“या ठिकाणी कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून देणाऱ्यास पाचशे रुपये बक्षीस दिले जाईल.”
व कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये दंड ग्रामपंचायतने करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी थेऊर ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते कार्यक्रमामुळे अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिक व भाविकांमध्ये प्रचंड नाराजी असून, “तत्काळ सफाई न झाल्यास ग्रामपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
👉 चिंतामणी नगरीला कलंक लावणाऱ्या या कचरा समस्येवर ग्रामपंचायत काय भूमिका घेते, याकडे आतासर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags