राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला असून, त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने सात दिवस विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य, व्यसनमुक्ती, सायबर क्राईम, पर्यावरण संवर्धन, ध्वनी प्रदूषण, तसेच जागरूक मतदार मोहिमेसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच उपक्रमांचा एक भाग म्हणून दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम या विषयावर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगातून समाजामध्ये जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला. कार्यक्रमास लोणी काळभोर व कदमवाकवस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
30 ऑगस्ट 2025 : व्यसनमुक्तीवर आधारित नाटक व व्याख्यान, तसेच सायबर क्राईमविषयी पथनाट्य व व्याख्यान.
31 ऑगस्ट 2025 : ध्वनी प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्य व व्याख्यान, तसेच अंध, मूकबधिर व अनाथ मुलांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम.
01 सप्टेंबर 2025 : पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण, तसेच आगामी निवडणुकांकरिता जागरूक मतदार या विषयावर नाट्य व व्याख्यान.
याबाबत बोलताना पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक न राहता सामाजिक व जनजागृतीचा उत्सव व्हावा यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस व ग्रामस्थ यांच्या सहभागातून समाजहिताचे संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.”
ग्रामस्थांनी या उपक्रमांचे स्वागत केले असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरत आहे.