म्हातोबाची आळंदी येथे प्रामाणिकपणाचा आदर्श ; हरवलेली सुवर्ण अंगठी प्रेमपूर्वक परत.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 

म्हातोबाची आळंदी येथे काही दिवसांपूर्वी उत्साहात यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान सोरतापवाडी येथील नवनाथ चौधरी हे गणेश जवळकर यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. भोजन करत असताना त्यांची मौल्यवान सुवर्ण अंगठी तेथेच हरवली.

त्यानंतर नवनाथ चौधरी हे दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी जेवणासाठी गेले असता, त्यांना अंगठी हरवल्याचे लक्षात आले. विशेष बाब म्हणजे, या घटनेबाबत नवनाथ चौधरी यांनी कोणतीही वाच्यता न करता, कुणालाही संशयाच्या भोवऱ्यात न आणता शांत राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गणेश जवळकर यांच्या घरी ही सुवर्ण अंगठी सापडली. सदर मौल्यवान ऐवज आपलाच असल्याची खात्री झाल्यानंतर, गणेश जवळकर यांनी आज ती अंगठी नवनाथ चौधरी यांना प्रेमपूर्वक माघारी सुपूर्द केली.

या घटनेमुळे गणेश जवळकर यांच्या प्रामाणिकपणाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे. हरवलेला ऐवज परत देताना आळंदी म्हातोबाची गावातील ज्येष्ठ नेते दत्तात्रय जवळकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रकाश जवळकर, अशोक जवळकर, ज्येष्ठ नेते भगवान जवळकर, योगेश चौधरी, सागर वाडेकर तसेच नवनाथ चौधरी उपस्थित होते.

प्रामाणिकपणा आणि विश्वास जपणाऱ्या या घटनेने समाजात सकारात्मक संदेश दिला

आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags