राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
उलव्यात साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात !
———–
उलवे नोड,नवी मुंबई – संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य शिलेदार,आंतर्राष्ट्रीय दर्जाचे विचारवंत,विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या वैश्विक मान्यतेच्या अलौकिक प्रतिभाशाली साहित्याचा परिसंवाद,चर्चासत्रे इ.उपक्रमांद्वारे शाळा महाविद्यालयातून तथा अन्य सामाजिक,सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपिठांवरून जागर व्हावा असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले.
मातंग चेतना परिषदेच्या वतीने साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त शेलघर येथे संपन्न झालेल्या जयंती सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कसदार साहित्याची वाहवा करताना आपण स्वतः अण्णाभाऊंच्या साहित्याचे चाहते असून त्यांची ‘ फकीरा ‘ ही जगप्रसिद्ध कादंबरी आपल्याला अभ्यासाला होती याची आठवण सांगून ‘ वारणेचा वाघ ‘ सारख्या अन्य साहित्य कृतींचा आजही समाजमनावर प्रभाव असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.त्याचप्रमाणे आपल्या उलवे,नवी मुंबई परिसराम मध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे उत्तम दर्जाचे स्मारक व्हावे या समाजाच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दर्शविला.यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे,साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील,
जितेंद्र म्हात्रे,सचिन घरत,सचिन राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
*उलवे नोड परिसरात अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करू* – आमदार अमित गोरखे
—
या जयंती सोहळ्याला महाराष्ट्र विधान परीषदेचे तालिका सभापती आमदार अमित गोरखे यांनी धावती भेट दिली आणि विश्वव्याख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नवी मुंबईतील स्मारकासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
*प्रमुख वक्ते डॉ.बळीराम गायकवाड*
‘ साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि सामाजिक भान ‘ या विषयावर भाष्य करताना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रिं.डॉ. बळीराम गायकवाड यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर विविध उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या अध्यासन केंद्राच्या वतीने राबवले जात असल्याचे प्रतिपादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बेदरकारपणे झोकून देत आपल्या साहित्याचा कस पणाला लावून मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी आपल्या शाहिरी कवनांतून लोकलढा उभारणाऱ्या विश्वविख्यात साहित्य सम्राटाचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे या मागणीचा जोर वाढायला हवा असे प्रतिपादन करतानाच त्यांनी डॉ.अण्णा भाऊं चे साहित्य विविध भाषांमध्ये भाषांतर झाल्याच्या फक्त व्यासपीठावरून बढाया मारून उपयोग नाही तर मराठी बरोबरच इतर विविध भाषांतील भाषांतरीत प्रती उपलब्ध करायला हव्यात असे आवाहन करून मुंबई विद्यापीठाच्या अध्यासन केंद्र मार्फत सध्या रशियन भाषेत भाषांतरीत सर्व साहित्य उपलब्ध असून इतर भाषांमधील साहित्य प्रतींचा शोध घेण्याचे काम चालू असून अध्यासन केंद्राच्या अनेक उपक्रम आणि अभ्यासक्रमामध्ये समाजातल्या तरुणांनी सहभाग नोंदवून उपक्रमांना प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी,कथा, प्रवास वर्णन,पोवाडे,लोकनाट्य इ वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारातील ९४ पुस्तके उपलब्ध असल्याचे डॉ.गायकवाड यांनी यावेळी सांगितले.आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जीवन व वैश्विक साहित्याचे अनेक पैलू त्यांनी यावेळी उलगडून दाखवले.
अध्यक्षीय भाषण :
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आनंद व्यंकटराव शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे उलवे,नवीमुंबई परिसरामध्ये उत्कृष्ट दर्जाचे स्मारक व्हावे या दृष्टीने आपण सर्वांनी निर्धार व्यक्त करून पाठपुरावा करण्यासाठी एकीची वज्रमूठ घट्ट करावी असे आवाहन केले.
जयराम वाघमारे,रामदास कांबळे,जगदिश सोनटक्के,किशोर अल्हाट,फकीरा पॅंथर चे संस्थापक ॲड.गुरु सूर्यवंशी आदींची भाषणे झाली.नंदकुमार आवळे यांचे काव्यवाचन झाले.
मातंग चेतना परीषदेचे संस्थापक डॉ.आनंद व्यंकटराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक अमित कुचेकर यांनी केले तर राष्ट्रीय लहुशक्तीचे सरचिटणीस सागरकुमार रंधवे यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य आणि जीवनातील प्रसंगांचा विश्लेषणात्मक वेध घेत ओघवत्या शैलीत केलेले सूत्रसंचालन उपस्थितांना भावले.
याप्रसंगी ॲड.अरविंद मस्के,अभंग शिंदे,डॉ.राजाराम भोसले,अमित कुचेकर,आदित्य शिंदे,संतोष थोरात,सागर वाघमारे,प्रमोद वाघमारे,सचिन सुराडकर,रमेश कदम,सचिन भिसे,जयसिंग घेवदे,दिलीप पाटोळे,कोंडीबा दोरवे,उद्धवजी बळे,मधुकर यादव,सुरेंद्र साठे,गणेश आवळे,राहुल चांदणे आदी आयोजन समितीतील सदस्य व मान्यवर आणि महिला आदी उपस्थित होते.