पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथे यशवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने हा महोत्सव दि. २० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे यांना निमंत्रित करण्यात आले असून उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, कृषिप्रेमी, कृषी तज्ज्ञ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवाबाबत झालेल्या बैठकीस दौंड तालुक्याचे माजी आमदार श्री. रमेश आप्पा थोरात,शिरुर हवेलीचे माजी आमदार श्री. अशोक बापू पवार, श्री. सुरेश आण्णा घुले, श्री. संदीप शेठ धुमाळ, श्री. सचिनतात्या तुपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की,
> “यशवंत कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रेरणा यांचा संगम ठरणार आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाबरोबरच पशुपक्षी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी हा महोत्सव मोठे योगदान देईल.”
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
या महोत्सवामध्ये सुमारे २०० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. प्रदर्शनात खालील गोष्टींचा समावेश असेल :
आंतरराष्ट्रीय दर्जाची शेती अवजारे
उच्च प्रतीची बियाणे व कीटकनाशके
हरितगृहे व कृषी जैविक तंत्रज्ञान
हॉर्टिकल्चर व बागायती पिके
मासेमारी व अक्वाकल्चर
डेअरी तंत्रज्ञान व दुग्धविकास
शेतमाल प्रक्रिया उद्योग व वेअरहाऊसिंग
अपारंपरिक ऊर्जा साधने
कृषी बाजार व विपणन तंत्रज्ञान
शेतकरी बचत गट व समूह शेती
सेंद्रिय शेती, शेळी-मेंढी पालन
या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनक्षमता वाढविण्याचे उपाय, तसेच शाश्वत शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांचा सन्मान
या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषिकन्या यांना “आदर्श शेतकरी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नव्या पिढीला कृषी व्यवसायाबाबत आकर्षण निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
आयोजन समितीची माहिती
या भव्य महोत्सवाचे आयोजन यशस्वी होण्यासाठी कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे श्री. प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर, श्री. ऋतुराज जवंजाळ, तसेच पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक श्री. बापू सोनवणे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
👉 २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या यशवंत कृषी महोत्सवामध्ये शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.