पुणे, दि. ५: साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार असून पात्र संस्थानी ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयास २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ६०० प्रशिक्षणार्थींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याअंतर्गत लाभार्थी, प्रशिक्षण संस्था यांच्या पात्रता व अटी- शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. या योजनेअंतर्गत अर्जदार हा मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्राचा तसेच पुणे जिल्ह्यातील रहिवाशी असावा. वय १८ ते ५० वर्ष असावे. त्याने शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जदाराने आधारसलग्न बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीने कौशल्य विकासचे अभ्यासक्रम निवडणे बंधनकारक राहील. संस्थेने कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार परीक्षेस बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकांची राहील त्याशिवाय संस्थेची फी अदा केली जाणार नाही. संस्थेची फी ठरवलेल्या नियमानुसार दिली जाईल. संस्था पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील असावी व इतर महामंडळाने लावलेले निर्बंध संस्थेस बंधनकारक राहतील.
जिल्हा स्तरावर एका अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी एकाच संस्थेची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची बायोमेट्रिक पद्धतीने व हजेरी पटावर स्वाक्षरीने हजेरी घेणे बंधनकारक राहील. विद्यार्थी निहाय प्रमाणीत केलेली हजेरी पाठविल्याशिवाय संबंधित प्रशिक्षण संस्थेची फी अदा केली जाणार नाही. संस्थेची निवड प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनंतर अंतीम मंजुरी मुख्यालय स्तरावरून देण्यात येईल.
पात्र लाभार्थी, प्रशिक्षण संस्थांनी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स. नं. १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे- ०६, येथे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०३०५७ वर संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शि. लि. मांजरे यांनी केले आहे.
0000