पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामधील पहिल्या घटनेत औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील लिपीक टंकलेखक राजेंद्र चांदोरे (वय ३८) आणि प्रशांत घाडगे (वय ३४) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे आहे की, यातील तक्रारदार यांनी बांधलेल्या नवीन घराची महानगरपालिकाद्वारे कर आकारणी करावी यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. यातील लोकसेवक प्रशांत घाडगे यांनी तक्रारदार यांच्याकडे नवीन बांधलेल्या घराचा कर कमी करण्यासाठी रु. २५ हजार लाचेची मागणी केली होती.
तक्रारदारानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लिपीक राजेंद्र चांदोरे आणि लिपीक प्रशांत घाडगे हे लाचेची मागणी करत असल्याची तक्रार केली. पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी करत असताना, रु२५ हजार लाच स्वीकारताना लिपीक राजेंद्र चांदोरे व लिपीक प्रशांत घाडगे यांना ताब्यात घेण्यात आले व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
तर दुसर्या घटनेत वासुली ता. खेड जि. पुणे येथील तलाठी सतिश संपतराव पवार ( वय ५२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सतिश संपतराव पवार यांनी सातबार्यावर ऑनलाईन न दिसणारे नाव सातबारावर दिसण्यासाठी लाचेची मागणी केली. दि. १७ जून रोजी यामधील २० हजार रु स्वीकारताना सतिश संपतराव पवार आढळले. त्यांच्यावर म्हाळुंगे पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमधील गुन्ह्याचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन आणि म्हाळुंगे पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.