राष्ट्रहित टाईम्सन्युज नेटवर्क
पुणे :गेल्या काही दिवसांपासून पुण्यात धक्कादायक प्रकार घडत आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात क्राइमच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यात खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आल्याने तर खळबळ उडाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्वाची घोषणा केली आहे.
चंद्रकांत पाटील (Pune News)यांनी पुण्यातील बार आण पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त करत काही उपाययोजना देखील सांगितल्या. त्यांनी पुण्यातील पब आणि बारबाबत मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पुणे हे जगातील व्यवसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरातील एक शहर झालंय की काय, अशी प्रतिमा निर्माण करणे आपण बंद केले पाहिजे. यावर प्रशासनाने तात्पुरती कारवाई न करता कठोर कारवाई करत राहिले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस पब आणि बिअर बार बंद करु, असे ठरवले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तसंच पुढे त्यांनी शरीरशास्त्राचा एक नियम सांगत सात दिवस क्लिअर ड्राय ठेवावा, असं मत मांडलं. रात्री 11 ला झोपले पाहिजे, असं शरीरशास्त्राचा नियम सांगतो. मग यांच्याबाबत तुम्ही रात्रभर दारु पिण्याची आणि अमली पदार्थ सेवन करण्याची परवानगी दिली काय?, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन नियमावली तयार करु, त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सर्वांनी करु. असं आवाहन देखील यावेळी चंद्रकांत पाटील (Pune News) यांनी केलं.
महाविद्यालयात समुपदेशकाची नवी पोस्ट निर्माण करण्याचा विचार
आमचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे, त्यामध्ये अत्यंत गांभीर्याने या सगळ्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक अतिरिक्त जागा निर्माण करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत, ज्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महाविद्यालयात समुपदेशकाची नवी पोस्ट निर्माण करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यादृष्टीने येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करु, असं आश्वासन देखील चंद्रकांत यांनी दिलंय.