जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात येणार नसेल तर गाव बंद ठेऊ: उरुळी कांचन ग्रामस्थांचा इशारा.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क

उरुळी कांचन :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशील जाहीर केला. त्यामध्ये उरुळी कांचन गावातील विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल असा उल्लेख केल्याने, मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी उरुळी कांचन मधील पदाधिकारी व ग्रामस्थ प्रचंड चिंताग्रस्त झाले असून, संत तुकाराम महाराज सोहळा प्रमुख व विश्वस्तांबद्दल प्रचंड चीड आणि नाराजी व्यक्त केली आहे.

जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, आश्रम रोड मार्गे उरुळी कांचन गावातून महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी जाणार नसेल, तर त्या दिवशी गाव बंद ठेवत प्रशासना बरोबर असहकार पुकारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यासंदर्भात मंगळवारी गावातील राम मंदिरात गावातील जेष्ठ पुढारी, ग्रामस्थ, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत याबाबतची एक बैठक झाली आणि त्यामध्ये वरील प्रमाणे निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

सरपंच अमितबाबा कांचन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हवेलीचे जेष्ठ नेते के.डी.कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन,तलाठी सुधीर जायभाये, माजी सरपंच संतोष ह. कांचन, राजेंद्र बबन कांचन, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, युवराज कांचन, माजी पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, गावातील दिंड्यांचे प्रमुख तुकाराम कांचन, जयसिंग कांचन, दीपक कांचन, गणेश ताकवले,तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सन १९९७ साली असाच वाद ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यामध्ये निर्माण झाला असताना, तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी पुढाकार घेत तो वाद मिटवला होता. व यापुढे अशा पद्धतीचा वाद होणार नाही अशी भूमिका विशद केली होती. त्याला अनुसरून २०२२ पर्यंत पालखी सोहळा सुरळीतपणे उरुळी कांचन गावात आश्रम रोडने,मारुती मंदिरात जाऊन अभिषेक पुजा व आरती स्वीकारून पुढील यवत मुक्कामासाठी महात्मा गांधी विद्यालय रस्त्याने सोलापूर रोडला लागून पुढे जात होता. मात्र २०२३ सालापासून विश्वस्तांच्या डोक्यात पुन्हा वेगळी भूमिका येऊन ते सातत्याने त्यामध्ये अडेलतट्टू पणाची भूमिका घेत, उरुळी कांचन ग्रामस्थांचा शांतीपूर्ण मार्गाने सर्व सोई सुविधांनी युक्त असा विसावा टाळण्याचा किंवा उरुळी कांचन वासियांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत. त्यामुळे मागील वर्षी प्रांत संजय आसवले यांच्या कार्यालयात देखील याबाबत विश्वस्त व ग्रामस्थ बैठक होऊन, गावातून पालखी नेण्याचा निर्णय झाला होता. त्याला हरताळ फासण्याचे काम सोहळा प्रमुख व विश्वस्त करीत असल्याने, उरुळी कांचन ग्रामस्थांनी प्रचंड नाराजीतून गाव बंद ठेवत, असहकार पुकारण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे.

यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे बाबत, अन्य सुविधा पुरविताना ज्या अडचणी अडथळे येतील त्याला सर्वस्वी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त जबाबदार असतील अशी भूमिका सर्वानुमते विशद करण्यात आली.

प्रतिक्रिया :सुमारे अडीचशे तीनशे वर्षाच्या परंपरेनुसार उरुळी कांचन गावातून ठरलेल्या मार्गाने पालखी विसावा घेऊन पुढे यवत मुक्कामासाठी जावी अशीच भावना उरुळी कांचन मधील सर्व ग्रामस्थांची आहे, तिला छेद देण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यात येईल : अमितबाबा कांचन सरपंच उरुळी कांचन

 

प्रतिक्रिया: मागील परंपरेनुसार व ग्रामस्थांच्या भावनेनुसार उरुळी कांचन येथे आश्रम रोड मार्गे गावातून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी यावी अशी सर्वांची भावना आहे. पालखी सोहळा आनंदाने आपल्या शहरातून जावा यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था पाळावी. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य अशा पद्धतीची भूमिका पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही घेऊ : शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरुळी कांचन पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags