राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
पुणे : | अवैधपणे गुटखा वाहतूक (Illegal Transportation Of Gutka) करणाऱ्या दोन पॅगो टेम्पोवर खडक पोलिसांनी कारवाई करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.13) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लोहीयानगर भागातील विराणी स्टील गल्लीमधील सोनमार्ग थिएटर समोर करण्यात आली.
अकिब शकील शेख (वय-32 रा. ए.पी. लोहीयानगर, पुणे), निजामुद्दीन मेहबुब शेख (रा. कोंढवा) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274,275,3(5) अन्न सुरक्षा मानके 30(2)(अ), 31(1), 26(2) (I), 26(2) (IV) प्रोहिबिशन अँन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार हर्षल चंद्रकांत दुडम (वय-42) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी रात्री हद्दीत पेट्रोलींग करत असताना तपास पथकाला लोहीयानगर भागातील सोनमार्ग थिएटरसमोर दोन पॅगो टेम्पो उभारले असून त्यामधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा), रोख रक्कम, दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अकिब याच्याकडे चौकशी केली असता निजामुद्दीन शेख याने प्रतिबंधित गुटखा इतर ग्राहकांना देण्यासाठी दिल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.