परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते’, कोर्टाचे चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क 

मी कोर्टात मंत्री संजय राठोडांविरोधात लढत असताना पत्रकार सुपाऱ्या घेवून प्रश्नं विचारतात”, असा आरोप भाजपच्या चित्रा वाघांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. पत्रकार परिषदेत लढवय्याची भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघांच्याच वकिलांनी मात्र काल कोर्टात राठोडांविरोधातली केस माघारी घेण्याची भाषा केली. त्यावरुन चित्रा वाघांसारखे राजकारणी जनहित याचिकांद्वारे राजकारण करुन न्यायालयांना त्यात खेचतात, या शब्दात कोर्टानं समाचार घेतला.

एका तरुणीसोबत मंत्री संजय राठोडांचे फोटो व्हायरल झाले होते. काही संवादाच्या क्लिप्सही होत्या. त्या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तेव्हा विरोधातल्या भाजपनं राठोडांविरोधात रान पेटवत राजीनामा मागितला. राजीनाम्यानंतर आणि राठोडांविरोधात गुन्हा दाखल होवून सीबीआय तपासाच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ कोर्टात गेल्या होत्या. या पार्श्वभूमीनंतर कोर्टात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. “3 वर्षांपासून राठोड यांच्या विरोधातल्या केसमध्ये काय केलं?”, असा सवाल न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना केला.वकील म्हणाले की, तरुणीच्या आत्महत्येवेळी राठोड नागपुरात होते. राठोडांच्या आवाजाचे नमुने घेतले, ते व्हायरल क्लिप्सासारखे होते. पण जुळले नाहीत. याशिवाय 2022 शिंदे-फडणवीस सरकारने राठोडांना मंत्री केलं, तेव्हा त्यांना क्लिनचीट मिळाल्याचा दावा केला होता.यावर चित्रा वाघांच्या वकिलांनी उभं राहत म्हटलं की, एक तर कोर्टानं केस निकाली काढावी किंवा नाहीतर ते केस परत घेतील. 3 वर्षांपासून राठोडांविरोधात गुन्हा दाखल करा म्हणून केस लढणाऱ्या चित्रा वाघांच्याच वकिलानं माघारीची भाषा केल्यानंतर मात्र न्यायाधीश खवळले. “परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर केला जातो. कोर्ट काही राजकारण करण्याचा मार्ग नाही, तुमची भूमिका काय हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल”, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकरांच्या खंडपीठानं चित्रा वाघ यांच्या वकिलांना खडसावलं.

 

यावर चित्रा वाघांच्या वकिलानंतर आपल्याला याचिका मागे घेण्याचे कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. आपण ज्यादिवशी पुढची तारीख द्याल, त्यादिवशी युक्तिवाद करु म्हणून कोर्टाच्या ताशेरे ओढण्याच्या मालिकेला पूर्णविराम दिला. आता चित्रा वाघांचाच वकील कोर्टात केस माघारीची भाषा करतोय. दुसरीकडे वाघ म्हणतायत की आपण तसं वकिलांना काहीही सांगितलेलं नव्हतं.यवतमाळमध्ये राठोडांच्याच केसबद्दल प्रश्न केल्यानं चित्रा वाघांनी कोर्टात गेल्याचं कारण देत पत्रकारावर राग-राग केला होता. मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनाच संजय राठोडांवर कारवाई करा म्हणून आव्हान देणाऱ्या चित्रा वाघ आता त्यांचंच सरकार असूनही सरकारऐवजी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगतात.

 

सरकारी वकिलांचाच युक्तिवाद राठोडांबद्दल मवाळ

गेल्या सरकारमध्ये तरुणीच्या कुटुंबियांनी कुणाविरोधातही तक्रार देण्यास नकार दिला, आता वाघ यांच्या भाजपचं सरकार आहे. स्वतः सरकार पुढाकार घेवून गुन्हा दाखल करु शकतं. मात्र सरकारी वकिलांचाच युक्तिवाद राठोडांबद्दल मवाळ आहे, आणि कोर्टात सरकारी वकिलांची भूमिका हीच सरकारची भूमिका असते.

 

सरकारी वकीलच तरुणीच्या आत्महत्येवेळी राठोड नागपुरात होते. त्यांच्या आवाजाचे नमुळे जुळत नाहीत. राठोड मंत्री झाले तेव्हा क्लीनचीटचा दावा झाला होता, असा युक्तिवाद करतायत, आणि वाघांच्या वकिलांनी केसचा निपटारा होत नसल्यास माघारीची भाषा वापरतायत. सरकारं बदलली की कोर्टामधल्या खटल्यांचं चित्रही कसं बदलतं, यावर स्वतः कोर्टानंच अनेकदा मिश्किल टिप्पण्या केल्या आहेत.

 

सत्तेत जाण्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात भुजबळांनी निधी मिळत नसल्याची केस केली होती. नंतर विकासाचं कारण देत भुजबळ अजितदादांसोबत सत्तेत गेले. यानंतर आता केस चालू ठेवायची आहे की नाही, असा टोला न्यायाधीशांनीच भुजबळांना लावला. त्यावर स्वतः भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाकडून वेळ वाढवून मागितली.

 

सत्तेत जाण्यापूर्वी 2023 च्या मार्च-एप्रिलमध्ये हसन मुश्रीफांवर अनेकदा ईडी छापे पडले. विकासाचं कारण देत जुलै 2023 ला ते अजितदादांसोबत सत्तेत गेले. योगायोगानं मुश्रीफ सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याविरोधातल्या पहिल्याच तारखेला ईडीचे वकील गैरहजर राहिले. कोर्टानं कानउघाडणी केल्यांवर दुसऱ्या तारखेलाही ईडीनंच स्वतःहून वेळ वाढवून मागितली

 

एका प्रकरणात भुजबळांना परदेश दौऱ्यावर निर्बंधासाठी ईडीनं केस केली होती. भुजबळ सत्तेत गेल्यानंतरच्या २ महिन्यांनी याच प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी नेमकी केस काय होती हेच ईडीच्या वकिलांना कोर्टात आठवलं नाही., त्याची कागदपत्रंही मिळाली नाहीत. यावर कोर्टानं ईडीच्या वकिलांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं.

 

आणि आता राठोड मविआत असताना व्हायरल क्लिपमधला आवाज राठोडांचाच असल्याचा दावा भाजप नेते करत होते. 2022 ला संजय राठोड शिंदेंसोबत सत्तेत सामील झाले. आता सरकारी वकिलानं त्या क्लिपमधल्या आवाजाचे नमुने राठोडांच्या आवाजाशी जुळत नसल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags