राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील याला अटक केली आहे. चेतन पाटील याला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई करत चेतन पाटील याला ताब्यात घेतले आहे.
मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील आणि कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा मालक जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हे दोघेही फरार होते. मालवण पोलीस ठाण्यात बांधकाम सल्लागार चेतन पाटील आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी चेतन पाटील याच्यावर अटकेची कारवाई केली. त्याचे दोन्ही मोबाईल बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पाटील याला त्याच्या शिवाजी पेठेतील घरातून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ नौदल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं.