राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे-महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. सुहास नाईक हे इटलीमधील मिलान विद्यापीठात संपन्न होत असलेल्या आंतरराष्ट्रीय इतिहास परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून रवाना झाले आहेत. त्यांच्या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे याबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे.
इटली मधील मिलान विद्यापीठात २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२४ या दरम्यान आंतरराष्ट्रीय इतिहास परिषद आयोजित करण्यात आली आहे. वंचितांच्या इतिहास अभ्यासाचे प्रणेते अंतनीओ ग्रामची यांच्या स्मृती प्रित्यर्थ या परिषदेचे आयोजन मिलान विद्यापीठाने केले आहे. या परिषदेत प्रा. सुहास नाईक यांच्या वंचितांच्या इतिहास संशोधनातील कार्याची दखल घेऊन त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.या परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी प्रा.सुहास नाईक हे नुकतेच इटलीला रवाना झाले. सदर परिषदेत ते महाराष्ट्रातील वंचित जातींच्या इतिहासाच्या अनुषंगाने भाष्य करणार आहेत.
प्रा. सुहास नाईक हे मुळचे सरुड, ता. शाहूवाडी,जि. कोल्हापूर येथील आहेत. सध्या ते लोणी काळभोर जि. पुणे येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या महाविद्यालयात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मातंग समाजासह महाराष्ट्रातील इतर वंचित जाती समुदायांच्या इतिहासावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ‘मातंग समाजाचा इतिहास’ हा ग्रंथ त्यांनी संपादित करून एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील मातंग समाजाचे अनेक अलक्षित संदर्भ उजेडात आणले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. देशभरामधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांनी वंचितांच्या इतिहासाच्या अनुषंगाने व्याख्याने दिली आहेत.
मिलान विद्यापीठ हे केवळ इटली मधीलच नव्हे तर संपूर्ण युरोपमधील एक महत्त्वाचे अभ्यास केंद्र मानले जाते. सुमारे ६० हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेतात.मिलान विद्यापीठातील या आंतरराष्ट्रीय इतिहास परिषदेमध्ये जगभरातील अनेक मान्यवर विद्वान इतिहास संशोधक सहभागी होत आहेत. या परिषदेत प्रा.सुहास नाईक हे महाराष्ट्रातील वंचितांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणार आहेत. वंचितांच्या इतिहास अभ्यासाचे प्रणेते अंतनीओ ग्रामची यांचे पणतू दस्तूर खुद्द प्रोफेसर तामीसो बाबियो यांनी प्रा.सुहास नाईक यांना निमंत्रित केले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या व इतर वंचित समुदायाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची व गौरवाची आहे. याबद्दल महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रा. सुहास नाईक यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.