राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी देखील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूचा मुद्दा गाजला. विरोधकांनी विधानसभेत दोन्ही मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.मात्र विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही मुद्द्यांवर उद्या चर्चा ठेवल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभात्याग केला.महाविकास आघाडीच्या आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, ‘अटक करा,अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा’, अशी जोरदार घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाल्मिक कराड ज्या फोनवरुन धमकी देतो त्या फोनची चौकशी होत नाही. सोमनाथ घुलेच्या फोनवरुन वाल्मिक कराडने शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला धमकी दिला. सोमनाथ घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे. त्याच्या फोनवरुन वाल्मिक कराड खंडणी मागतो.
वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का?- जितेंद्र आव्हाड
खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होतो, मात्र हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही. वाल्मिक कराड कोण आहे. वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? सरकारची सुरुवातीलाच लाज जात आहे. वाल्मिक कराडला अटक झाली नाहीत सोमवारी-मंगळवारी बीडमध्ये आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
आरोपींचा आका शोधला पाहिजे – सुरेश धस
भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत म्हटलं की, संतोष देशमुखांची आर्थिक देवाणघेवाण नव्हती. मी पण जिल्ह्यातच राहातो. ज्यांनी मुडदा पाडला त्यांचा आका शोधला पाहिजे. एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिल आहे. आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे. सीआयडीला नावं ठेवत नाही मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली. आज किंवा उद्या एसआयटी गठीत होईल, त्यानंतर ॲक्शन होईल, असंही धस यांनी म्हटलं.
कोण आहे वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड हा परळी नगरपरिषदेचा नगराध्यक्ष राहिला आहे. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे. धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय आहे. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील सर्व कामे वाल्मिक कराडच पाहतो. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे प्रमुख आरोपी आहे, तो वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे