पुणे : पुण्यातील एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. प्रेमभंग झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. विष प्राशन करून तृतीयपंथीयाने आपलं जीवन संपवलं आहे. रुपा देवी माहेश्वरी (सारंग पुणेकर पूर्वाश्रमीचे नाव) असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या. रुपा माहेश्वरी या सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुण्यात काम करत होत्या. त्या उच्चशिक्षित आणि कवयित्री होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलने आणि सामाजिक कार्य केले आहे. शहरातील महत्वाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांसाठी हिजडा शब्दाचा प्रयोग केल्यानंतर बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या समोर रस्ता रोखत त्यांनी केलेले आंदोलन चर्चेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथील एका तरुणासोबत त्यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या तीन ते चार वर्ष हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रुपा नेहमी जयपूरला जात असे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांची भेट झाली नव्हती. रूपा यांच्या प्रियकराचं वागणं बदलल्याची त्यांची तक्रार होती.
आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचे कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला रुपा यांच्याशी बोलणं बंद करायला सांगितले. तेव्हापासून प्रियकर रुपाशी बोलत नव्हता. हाच विरह सहन न झाल्याने १३ जानेवारीला रूपा जयपूरला पोहोचल्या. तिथे प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास त्याची वाटही पाहिली. मात्र तो बाहेर आलाच नाही. याच नैराश्यातून रूपा यांनी प्रियकराच्या घरापासून अगदी काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. रूपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्याच परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बॉटलही सापडली. त्यामुळे या प्रकरणाची आता पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.