पिंपरी चिंचवड: पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात वारकरी शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेत काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहुणा बनून आलेल्या एका आरोपीनं मध्यरात्री शाळेत राहणाऱ्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्याही ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा देवाच्या आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका महाराजाने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून आरोपी पीडित मुलीचं शोषण करत होता.
पीडित मुलीनं तिच्यासोबत घडणारा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी महाराजाला अटक केली आहे. किरण महाराज ठोसर असं अटक केलेल्या ३३ वर्षीय आरोपी महाराजाचं नाव आहे. त्याने आळंदीमधील चऱ्होली खुर्द रस्त्यावर असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या खासगी शाळेत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे. 15 सप्टेंबर 2024 ते 23 जानेवारी 2025 या चार महिन्याच्या काळात आरोपनं अनेकदा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे. 23 तारखेला अशाच प्रकारचा प्रयत्न आरोपीनं केला होता. यानंतर पीडितेनं घटनेची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडितेच्या आईनं आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत ठोसर विरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी आरोपीवर पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.15 दिवसांपूर्वी देखील या शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. यानंतर आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. याप्रकरणी आळंदीकर ग्रामस्थ आणि पालक या शिक्षण संस्थांच्या विरोधात संताप व्यक्त करू लागलेत.