पुणे : दारु पित बसले असताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारुन त्याचा खुन केला. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बारिश ऊर्फ बार्या संजय खुडे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, तालीम चौक, कोंढवा) आणि आकाश सुभाष मानकर (वय २३, रा. आर के कॉलनी, गोकुळनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मल्लेश कुपिंद्र कोळी (वय ३२, रा. आर के कॉलनी, गोकुळनगर, कोंढवा) असे खुन झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस हवालदार रणजित शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लेश कोळी व दोन्ही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. तिघेही काहीही काम धंदा करत नाहीत. कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी ते दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा दोघांनी मल्लेश कोळी यांच्यावर लाकडी दांडक्याने व सिमेंटच्या ब्लॉकने तोंडावर, डोक्यामध्ये मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. ही माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिसरात चौकशी केल्यावर मल्लेश कोळी याची ओळख पटली. त्याच्याबरोबर दोघे जण दारु पित बसले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बारिश खुडे व आकाश मानकर यांना पकडून अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.