पुणे : औंध येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली तरुणींचा ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने छापा घालून थायलंडच्या ४ तरुणींसह ९ जणींची सुटका केली. वेश्या व्यवसाय करवून घेणार्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मॅनेजर रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय २६, रा. मुरकुटे प्लाझा, औंध, मुळ रा. बेरबेरी रोड, जि. नागांव, आसाम) याच्यासह स्पा मालक, कॅशियर, मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला औंध येथील मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविण्यात आले. या बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यात ४ थायलंड येथील तरुणी तसेच ४ महाराष्ट्र व १ गुजरात राज्यातील तरुणीं अशा ९ तरुणींची सुटका केली. मसाज सेंटरच्या नावाखाली आर्थिक फायद्यासाठी कामासाठी येणार्या महिलेंकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत होते. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निर्रीक्षक विजयानंतर पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी केली आहे.