पुणे : हॉटेलमधून चिकन राईसचे पार्सल घेतल्यानंतर हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर मला राक्या भाई म्हणतात, मला पैसे मागतोस का असे म्हणून हॉटेल चालकाला मारहाण करायला धावून गेला. हवेत हत्यार फिरवून धमकी देत दहशत पसरविल्याचा प्रकार मांजरी येथे घडला. याबाबत राहुल अंबादास भोवाळ (वय ३१, रा. सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राकेश थोरात (वय २२, रा. मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी -मुंढवा रोडवरील नायकल्स या हॉटेलमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भोवाळ यांचा मुंढवा रोडवरील चैतन्य कॉम्प्लेक्समध्ये नायकल्स नावाचे छोटे हॉटेल आहे. ते हॉटेलमध्ये असताना परिसरातील गुन्हेगार राकेश थोरात तेथे आला. त्यांच्याकडून चिकन राईस पार्सल घेतले. राहुल यांनी पैसे मागितल्यावर उद्या पैसे देतो, असे बोलला. त्यावर राहुल याने माझे धंद्यावर कुटुंब चालत असल्याने आताच पैसे देण्यास सांगितले. त्यावर राकेश याने शिवीगाळ करत पँटच्या आतून हत्यार बाहेर काढून त्यांच्या अंगावर धावून गेला. ”मला राक्या भाई म्हणतात. तू ओळखत नाहीस का मला, मला पैसे मागतोस का, खल्लास करुन टाकीन, या एरियातला भाई आहे मी,” असे ओरडून दुकानाबाहेर उभा राहून हवेत हातातील हत्यार फिरवत ”मी या एरीयातला भाई आहे. कोणी मला नडला तर मारुन टाकीन ” असे ओरडत होता. त्याला घाबरुन आजूबाजूची लोक पळून गेली. राहुल भोवाळ हेही घाबरुन लपून बसले. राकेश थोरात निघून गेल्यानंतर त्यांनी हॉटेल बंद करुन घरी आले. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.