पुणे : उसने पैसे घेऊन ते परत करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रतिज्ञा पत्र करुन एक महिन्याच्या उधारीवर बांधकाम व्यावसायासाठी लागणार्या गाड्यांसाठी तब्बल २६ लाख ९८ हजार रुपयांचे २८ हजार लिटर डिझेल उधार घेऊन फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (वय ४१, रा. श्रीराम चौक, वानवडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अरुण श्रीनिवासा बायरेड्डी (रा. नानाई बाग, वानवडी) व त्यांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार चंदननगरमधील हॉटेल ग्रॅडन येथे १ जुलै ते ३१ जुलै २०२४ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सय्यदनगर येथे मगर फ्युअल स्टेशन नावाचा पेट्रोल पंप आहे. ते डोअर टु डोअर डिझेल विक्रीही करतात. अरुण श्रीनिवासा बायरेड्डी यांनी इव्हेंड मॅनेजमेट तसेच हॉटेल लाईनचे काम करत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. होळी निमित्त एका इव्हेंटसाठी पैशांची गरज असल्याने सांगून फिर्यादी यांच्याकडून ४ लाख रुपये घेतले. इव्हेंट झाल्यावर तयांनी ४ लाख रुपये परत केले. त्यानंतर हॉटेल बिझिनेससाठी ४ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी ४ लाख रुपये दिले होते. त्यांनी ते थोडे थोडे करुन परत केले़. मे २०२४ मध्ये अरुण बायरेड्डी यांनी फिर्यादी व सरबजितसिंग बग्गा यांना जेवणासाठी हॉटेल ग्रँड नवमी येथे जेवणासाठी बोलावले.
मी कन्स्ट्रक्शनमध्ये व्यवसाय सुरु केला आहे. तुम्ही त्यात गुंतवणुक करा, अशी ऑफर दिली. फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावेळी त्यांनी आम्हाला महिन्याला २५ ते ३० हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. तुम्ही एक महिना क्रेडिटवर सप्लाय करावा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार प्रतिज्ञापत्र तयार करुन त्यांना १ जुलै २०२४ पासून डिझेल सप्लाय सुरु केला. महिन्याभरात २६ लाख ९८ हजार ५१५ रुपयांचे २८ हजार लिटर सप्लाय करण्यात आला. त्याचे बिल फिर्यादी यांनी पाठविले. परंतु, बायरेड्डी याने महिन्याचे बिल न दिल्याने फिर्यादी यांनी ऑगस्टमध्ये डिझेल सप्लाय थांबवुन बिलाची मागणी केली. तेव्हा बायरेड्डी याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. त्यांनी सिक्युरिटी म्हणून दिलेला धनादेश बँकेत भरला असता तो बाऊन्स झाला. फिर्यादी यांनी उर्वरित २ धनादेश पाहिल्यावर या धनादेशावरील सही तसेच त्यांनी करुन दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील सह्या वेगवेगळ्या असल्याचे लक्षात आले. त्याने फिर्यादी यांना खोट्या सहीचा बनावट दस्त बनवून आर्थिक फसवणुक केल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक आश्विनी पाटील तपास करीत आहेत.