पुणे : मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमास विरोध होत असल्याने भाच्याने मामाच्या मुलाचा चालत्या एस टी बसमध्ये कोयत्याने १८ वार करुन निर्घुण खुन केला होता. या खटल्यात सत्र न्यायालयाने भाचाला आजन्म कारावास व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. राजगुरुनगरमधील दावडी येथे १२ जून २०१८ रोजी ही घटना घडली होती. अजित भगवान कान्हुरकर (वय ४०, रा. दावडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीनाथ खेसे असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. खेड येथील सत्र व जिल्हा न्यायाधीश एस पी पोळ यांनी हा निर्णय दिला आहे. अजित भगवान कान्हुरकर याचे मामाच्या मोठ्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला मुलीचा व तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्याला अनेक वेळा समजावून देखील अजित मुलीला व तिच्या कुटुंबाला त्रास देत होता. म्हणून अजित विरुद्ध अनेक वेळा पोलीस तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे अजित चिडून होता. त्याच रागापोटी मामाचे खानदान संपवायचे या उद्देशाने १२ जून २०१८ रोजी पाळत ठेवून तो मामाचा मुलगा ज्या बसने शाळेत जातो, त्या बसमध्ये आधीच जाऊन बसला. श्रीनाथ खेसे सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी बसमध्ये बसला. बस खेसे वस्तीतून ५०० मीटर पुढे गेल्यावर दबा धरुन बसलेल्या अजितने बहिणीसमोरच श्रीनाथवर चालत्या बसमध्ये पाठीमागून सपासप डोक्यात कोयत्याने १८ वर केले. त्यात श्रीनाथच्या डोक्याचा अक्षरश भुगा झाला. त्याचा जागेवरच मृत्यु झाला. बस तशीच पोलीस ठाण्यात नेऊन श्रीनाथचे चुलते शिवाजी खेसे यांनी फिर्याद दिली.
या प्रकारामुळे संपूर्ण गावाने दोन दिवस कडकडीत बंद पाळला होता. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणातील ओळख परेड पंचनामा ही गहाळ झाला होता. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील झाले होते. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, प्रदीप जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला. अॅड. सागर कोठारी (Adv Sagar Kothari) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. सहायक अॅड. नारायण पंडित (Adv Narayan Pandit), अॅड. विनया जगनाडे (Adv Vinaya Jagnade) यांनी या प्रकरणात एकूूण १६ साक्षीदार तपासले. प्रमुख प्रत्यक्षदर्शी एस टी बस वाहक व श्रीनाथ खेसे याची लहान बहिण यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. पोलीस अंमलदार विजय चौधरी आणि खरात यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.
न्यायालयाने ७ फेब्रुवारी रोजी आरोपीला दोषी ठरविले होते. त्यानंतर शिक्षेबाबत युक्तीवाद करताना सरकार पक्षातर्फे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आज आरोपी कान्हुरकर याला आजन्म कारावास जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.