पुणे – सहकारी सिक्युरिटी गार्डने सोसायटीत येताना एंट्री करायला लावल्याच्या रागातून त्याने साथीदाराचा खुन केला. त्यानंतर तो तब्बल १६ वर्षे गावाकडे न जाता वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होता. इतकी वर्षे लपून राहिल्याने आता पोलीस काही आपल्यापर्यंत पोहचत नाही, असा विश्वास त्याला वाटू लागला. त्यातून तो बिनधास्त झाला होता. इतकी वर्षे गावाकडे कोणाशी संपर्क न ठेवणार्या या आरोपीने गावाकडे फोन करु लागला. त्यातूनच पोलिसांना हा धागा लागला. त्यावरुन पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधत गोवा गाठला आणि एका कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
