राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५० पेक्षा अधिक घरफोड्या करणार्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या गुन्हेगाराचे नाव हर्षद गुलाब पवार असून, त्याचे वय ३१ वर्ष आहे आणि तो गुलाबनगर, घोटावडे फाटा, मुळशी जिल्हा पुणे येथे राहतो.४ फेब्रुवारी २०२५ रोजी, शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना म्हसोबा गेट बस थांबा येथे हर्षद पवार नावाचा संशयित आरोपी सापडला. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या सॅकची तपासणी केली असता, त्यात सोन्या-चांदीचे दागिने आढळले. चौकशीत त्याने विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५० पेक्षा अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली.पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद पवार याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत तीन, वारजे माळवाडी हद्दीत तीन, खडक हद्दीत दोन, विमानतळ हद्दीत दोन तर चंदननगर, बावधन आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा एकूण १३ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रूपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, राजकिरण पचार, महावीर कलटे, सचिन जाधव, आदेश चलवादी यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चौकशीमध्ये हर्षद पवार याने घरफोड्याची कबुली दिली आणि अनेक ठिकाणी रेकी करून घरफोड्या केल्याचे सांगितले. त्याने विविध जॅकेट, टोपी परिधान करून वेशभूषा बदलण्याची पद्धत वापरली होती आणि सीसीटीव्ही कॅमेरा टाळण्यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची ॲक्टींग करत असे.पोलिसांनी हर्षद पवार याच्याकडून १७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदीचे दागिने, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या ४९ किल्ल्यांसह समाविष्ट आहे.
हर्षद पवार याने चोरलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी निलकंठ राऊत याची मदत घेत असे.
हर्षद पवार याच्यावर यापूर्वी अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. २०२३ मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरूवात केली होती.
हर्षद पवार याला भादंवि. कलम ३०५ (क), ३३१ (४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
.