स्वारगेट बलात्कार प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

Facebook
Twitter
WhatsApp

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. रुपाली चाकणकर म्हणाल्या, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”काल सकाळी ही घटना घडली. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. त्यानंतर मुलीने सकाळी साडे नऊ वाजता पोलिसांत तक्रार नोंदवली. यात पोलिसांकडून जातीने लक्ष घातलं जातंय. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केले असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर काढला आहे, त्यानुसार लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे”, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले, पीडित २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही, तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags