पुणे – स्वारगेट एस टी बसस्थानकाच्या आवारातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणार्या दत्तात्रय गाडे याच्या मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली.गाडे याचे आई वडिल आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडे याने यापूर्वी किमान ६ गुन्हे केले असून त्याला एका गुन्ह्यात शिक्षाही झाली होती. गाडे पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी अगोदर ८ पथके काम करीत होती. आता त्यात वाढ करुन १३ पथके करण्यात आली आहे. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी बुधवारी रात्री चौकशी केली. त्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत गाडे याने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणीचे मोबाईल क्रमांक मागितले होते. त्यांनाही गाडे याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याने २०१९ मध्ये कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारमधून तो पुणे अहिल्यानगर या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. याच दरम्यान महामार्गावर अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या वृद्ध महिलेला लिफ्ट देत असे. वाटेत घरुन जेवणाचा डबा घ्यायचा आहे, किंवा जवळच्या मार्गाने जाऊ असे सांगून महामार्गाजवळील आडमार्गाला नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने काढून तो महिलेला तेथेच सोडून पळून जात असे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्याच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आले होते. त्यात शिक्रापूर येथे २, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव, कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हे दाखल आहेत.
