पुणे – पुण्यात स्वारगेट एसटी बस आगारमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यामुळे पुण्याच्या कायद्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना ताजी असताना आता भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला.या घटनेत हॉटेलचालक वाचला. पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर काही तरुणांमध्ये वाद होऊन त्यांचे मारामारीत रूपांतर झाले. ज्या ठिकाणी या गुंडांची मारामारी झाली ती एका हॉटेलच्या गेटसमोर झाली. हॉटेलचे मालक अमित खैरे (वय:२९ वर्षे, रा. आंबेगाव पठार ) यांनी या तरुणांना’आमच्या हॉटेल समोर भांडणे करू नका’, असं सांगितलं. पण संतापलेल्या या गुंडांना अमित खैरे याचं म्हणणं जिव्हारी लागलं. त्यांनी खैर यांच्यावरच हल्ला केला. त्या तरुणांनी हॉटेलचालकालाच सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला. त्यानंतर अमित खैरे हे भारती विद्यापीठाच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तक्रार देऊन ते रुग्णालयात जात असताना त्या गुन्हेगारांनी त्यांना रस्त्यात अडवलं. त्यानंतर पुन्हा बाचाबाची करत मारहाण केली आणि बाटलीतून आणलेलं पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होते. ते तरुण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने हॉटेलचालकाने दुचाकी तिथेच टाकून पळ काढला.मात्र, त्या गुन्हेगारांनी त्या हॉटेलचालकाची दुचाकीच पेटवून दिली. अशा गुन्हेगारी स्वरूपाचे असलेले तरुणांच्या टोळक्याकडून परिसरात भीतीचे वातावरण दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
