पुणे – कर्नाटकात पोलीस अंमलदारांचा खून केल्यानंतर शिक्षा भोगत असताना विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून पळून गेलेला कैदी तब्बल ११ वर्ष पुणे व परिसरात लपून रहात होता.फुरसुंगी पोलिसांनी अशा फरार झालेल्या कैद्याला पकडले आहे. तीन महिन्यांपूर्वी फुरसुंगी पोलिसांना अशा एक कैदी गंगानगर परिसरात रहात असल्याची टीप मिळाली होती. पण त्याचा चेहरा अथवा अन्य काही माहिती मिळत नव्हती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांकडून अधिक माहिती मिळवून आरोपीचा शोध घेतला. अमरीश काशीनाथ कोळी (वय ४५, रा. घाटगे ले आऊट, कलबुर्गी, कर्नाटक, सध्या रा. गंगानगर, फुरसुंगी) असे या लखोबा लोखंडेचे नाव आहे. अमरीश कोळी याने एकूण तीन लग्ने केली असून त्याच्या दोन पत्नी सोलापूरला तर एक पत्नी गुलबर्गा येथे आहे. फरारी असताना दोन लग्ने केली.पोलीस अंमलदार आपल्या कर्तव्यावर असताना अमरीश कोळी याने त्यांचा २००९ मध्ये खुन केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला ३० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असताना त्याने आजारी पडल्याचा बहाणा करुन उपचाराकामी विजापूर शासकीय रुग्णालयात दाखल झाला. उपचार घेत असताना तो १४ ऑगस्ट २०१४ रोजी पोलिसांच्या रखवालीतून पळून गेला होता. याप्रकरणी विजापूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो पळून गेल्याने चार पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले होते. गेली ११ वर्षे तो सोलापूर व पुणे येथे लपून छपून रहात होता.
फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुनिल कांबळे व वैभव भोसले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अमरीश कोळी हा शिक्षा भोगत असताना ११ वर्षांपूर्वी पळाला होता. तो सध्या राहुल कांबळे व राजू काळे असे बनावट नाव धारण करुन ओळख लपवून राहत आहे. ही माहिती फुरसुंगी पोलिसांना तीन महिन्यांपूर्वी मिळाली होती. या माहितीमध्ये तो कसा दिसतो, सध्या कोठे राहतो याचा नेमका पत्ता माहिती नव्हता. या टीप वरुन पोलिसांनी माहिती काढण्यास सुरुवात केली. गुलबर्गा पोलिसांकडून त्याची माहिती व फोटो मागवून घेण्यात आला. त्यावरुन आरोपीची खात्री पटवण्यात आली. गुलबर्गा पोलीस ठाण्यातून पोलीस अंमलदार भिमानायक व शशीकुमार हुगार हे २६ फेब्रुवारी रोजी पुण्यात आले. त्याच्याबरोबर पोलीस हवालदार महेश उबाळे व पोलीस अंमलदार सुनिल कांबळे व वैभव भोसले यांनी अमरीश कोळी याला पकडले. पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानंतर तो लपून छपून सोलापूर व पुण्यात नाव बदलून रहात होता. अगोदर गुलबर्गा येथे असताना त्याने विवाह केला होता. त्यानंतर सोलापूर येथे त्याने आणखी दोन लग्ने केली. सोलापूरातच त्याच्या दोन पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्याने बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड काढले होते. तो कधी रिक्षा चालवत असे तर कधी मजुरी करत असे. सोलापूर, पुणे येथे येऊन जाऊन रहात होता. त्याला पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
